Monday, 22 March 2021

Aji Ajoba anniversary

गेली 47 वर्षे तुम्हाला लाभला सुखाचा सहवास,
आयुष्यातला प्रत्येक क्षण एकमेकांच्या साथीने केला खास,
उर्वरित आयुष्याची वर्षे एकमेकांसोबत सुखाची जावोत ही सदिच्छा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

कष्ट करून तुम्ही मुलांना आणि नातवंडांना वाढवलं,
जगातलं सगळं सुख तुम्ही त्यांच्या वाट्यास दिलं,
आयुष्य कसं जगायचं हे तुम्हीच त्यांना शिकवलं,
तुमच्या कष्टांमुळे त्यांना या प्रकारे घडवलं !

स्वतःची स्वप्न आणि इच्छा मागे सारून प्रत्येकासाठी तुम्ही खूप झटलात,
एकमेकांच्या साथीने छोट्याश्या घरट्याचा ताजमहाल बांधलात,
कित्येक आयुष्य घडवताना स्वार्थ कधी पाहिलाच नाही,
सढळ हाताने ज्ञानार्जन करताना हिशोब कधी ठेवलाच नाही!

खंबीरपणे डोक्यावर हात ठेवत, कशाचीच कमतरता जाणवू दिली नाही,
पाठीशी उभी भक्कम सावली, उन पावसातही ढळली नाही,
आशीर्वाद तुमचा सदैव, सोबत आमच्या राहु द्या,
लहानांचे दोन कौतुकाचे शब्द, नेहमी प्रमाणे गोड मानून घ्या!

Monday, 8 March 2021

महिला दिवस

महिला दिवस हा आपल्या भारतीय संस्कृतीत खूपच महत्त्वाचा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आपल्या संस्कृतीत महिलांचा मान हा नक्कीच मोठा. जरी पाश्चात्य देशातून याचा उगम झाला असला, तरी आपल्या  संस्कृतीत असलेला महिलांचा मान बघता ह्याला आपल्यात रुजायला जास्त वेळ लागला नसेल हे निश्चित.

खरं पाहता महिलेच आयुष्य हे अनेक वेगवेगळ्या टप्प्यातून जात असते. ती कुणाची आई असते, कुणाची बायको, कुणाची मुलगी तर कधी कुणाची सून असते. म्हणूनच का काय देवाने तिला काही अनन्यसाधारण असे गुण दिले असावेत, जेणेकरून ती प्रत्येक नात्यातून जात असताना त्या नात्याची कसोटी पार करेल. 
खरं पाहायला गेलं तर तिचं आयुष्य हे एखाद्या काटेरी रस्त्यावरून चालण्यापेक्षा कमी नसावं हे मत आणि,  ह्या गोष्टीचं कौतुक करण्यासाठी फक्त एक दिवस असणं म्हणजे हा खरंच त्यांच्यावरचा अन्याय आहे.

पण थोडासा परखड पणे बोलायला गेलं तर आजकाल कुठे तरी बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होताना जाणवत आहे. स्त्री वरील अन्यायाला वाचा फोडणारे असंख्य कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, स्त्री पुरुष समानता हा विषय अनेकांनी डोक्यावर घेतला, आणि खरं सांगायचं तर ते स्तुत्यच आहे. स्त्री ला पुरुषाच्या समान मान मिळायलाच हवा आणि मी त्या गोष्टीशी पूर्ण सहमत आहे. पण कुठेतरी सध्या हे जाणवतं की या समानतेच्या लढ्यात खरंच आपली स्त्री काही गोष्टी विसरत आहे का? अर्थात हा तिचा स्वतंत्र निर्णय हवा पण त्यामुळे आपल्या पूर्वापार चालतं आलेल्या संस्कृतीचे जर शकलं होणार असतील तर हे कितपत योग्य आहे? याची काही मर्यादा असायला हवी का? ह्या गोष्टींचा विचार आता खरंच व्हायला हवा.

काही उदाहरणादाखल, आज प्रत्येक स्त्री ही कॉर्पोरेट क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे, पण आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की आपले काही कर्तव्य आहेत ह्याचा सुद्धा यात विसर पडतो हे वाईटच. मान्य की घरातील गोष्टींकडे लक्ष देणं ही एकट्या स्त्री ची जवाबदारी नाही पण पूर्णपणे दुर्लक्ष करणं नेहमीच वाईट. आज आपण पाहतो, अनेक स्त्रिया आपल्या करिअर साठी मुल नं होऊ देण्याचा निर्णय घेतात, पण यावेळेस त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, मुल होणं याचा सर्वस्वी अधिकार हा देवाने फक्त स्त्री ला दिला आहे मग आपण त्या गोष्टीला विरोध करून निसर्गाच्या नियमाशी छेडछाड तर करत नाही आहोत ना?

आजकाल आपण लग्न झाल्यानंतर पाहतो, मुली मुलांच्या आई वडिलांना सांभाळायला तयार नसतात, पण मुलाने आपल्या आई वडिलांकडे पाहावं ही अपेक्षा असते, आणि आजकाल हे सरस पाहायला मिळत. पण यातून आपण साधत काय आहोत? ज्या पद्धतीने मुलाने तुमच्या आई वडिलांचा सांभाळ करावा ही इच्छा किंवा अपेक्षा असते त्याच पद्धतीने तुम्ही त्याच्या घरच्यांची काळजी घ्यावी ही माफक अपेक्षा जर तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर मग स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा ना मरलेल्याच बर्या ह्या तरी विचाराचा मी आहे.

राहिला प्रश्न घरातील कुलधर्म आणि कुलाचारांचा, आज तसं पाहायला गेलं,  तर आपला देश हा इतर देशांपेक्षा वेगळा दिसून येतो ते आपल्या संस्कृती आणि संस्कारांमुळेच. जर आज आपणच या गोष्टींना विरोध केला तर आपल्या पुढच्या पिढीसाठी या गोष्टी पूर्णपणे विसमरणात जातील किंवा नष्ट होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. मग कुठेतरी दोघांनी मिळून जर या गोष्टी पाळल्या त्या मोठ्या केल्या तर बिघडलं कुठे.

मला माहितीये की यामध्ये प्रत्येकाचे मत वेगळे असतील असे अनेक मुद्दे आहेत जे मी यात नमूद केले नाहीत. पण माझ्यामते ज्या दिवशी स्त्री पुरुष मिळून या सर्व गोष्टी एकत्र आचरणात आणतील तेंव्हा आपण खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समान आहेत असे म्हणू. तूर्तास जुन्या पुरुष प्रधान संस्कृती कडून नवीन स्त्री प्रधान संस्कृतीकडे वाटचाल सुरू आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही.

आज महिला दिन आहे या दिवशी आपण सगळे पुरुष हे वचन घेऊ की प्रत्येक महिलेला समान वागणूक मिळेल याचा आपण प्रयत्न करूया, आणि सर्व महिला हे वचन घ्या की स्त्री पुरुष समानता घडवत असताना आपण कोणावरही अत्याचार नं करता,  निसर्गाने दिलेल्या काही गोष्टींचा सन्मान करू. तरच रोज खऱ्या अर्थाने महिला आणि पुरुष दिन साजरा होईल. वर मांडलेल्या प्रत्येक विषयावर मला वेळ मिळेल तसं मी संक्षिप्त स्वरूपात लिहेनच, तूर्तास इथेच थांबू.

© ईशान नांदेडकर